रुग्णांशी साधला संवाद, समस्येवर चर्चा
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी अचानक भेट दिल्याने काहीवेळ प्रशासनाची धावपळ उडाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट रुग्ण कक्षात जाऊन रुग्णांची संवाद साधला तसेच जिल्हा रुग्णालयातील आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध समस्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाय योजनेसंदर्भात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
कीर्ती कुमार पुजार गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सायकलवर फिरून शहराची पाहणी केली. त्यानंतर नगरपालिकेला स्वच्छतेबाबत सूचना केल्या असून, वन विभागालाही वृक्ष लागवडीसाठी नियोजन करण्याचे सुचविले आहे.
तर पंधरा दिवसाला ते नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. स्वच्छतेसोबतच जिल्ह्याच्या आरोग्य संदर्भात त्यांनी आरोग्य विभागासोबत चर्चा केली तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात येऊन विषय समजून घेण्याचे आश्वासन अधिष्ठाता यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी अंतर रुग्ण विभागात जाऊन रुग्णांशी संवाद साधला तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चव्हाण, प्रशासकीय अधिकारी पाध्ये यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणीसंदर्भात चर्चा केली.
जिल्हा रुग्णालयात कोणत्या सुधारणा करता येतील,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणी काय आहेत, त्या दूर करण्यासाठी काय केले पाहिजे,यावर त्यांनी चर्चा केली.
जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक विषय समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची तयारी महत्वपूर्ण आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतात, अशी जिल्ह्याला अपेक्षा आहे.