आरंभ मराठी / मुरुम
उमरगा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका निर्दयी वडिलांनी स्वतःच्या पत्नीचा आणि अवघ्या आठ वर्षांच्या निष्पाप मुलीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथील या दुहेरी हत्याकांडामुळे समाजमन हादरून गेले असून, नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या माय-लेकींची नावे लिंबाबाई अजित वासुदेव आणि मानसी (वय ८ वर्षे) अशी आहेत. कुटुंबाच्या सुरक्षित सावलीत असलेले घरच त्यांच्या मृत्यूचे ठिकाण ठरल्याने या घटनेची वेदना अधिक तीव्र झाली आहे. निरागस बालिकेचा अशा क्रूर पद्धतीने जीव घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अजित वासुदेव याने मंगळवारी (दि. ७) पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मुरुम पोलिस ठाण्यात स्वतः हजर होऊन पत्नी व मुलीचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
या अमानुष कृत्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कुटुंबातील वाद किंवा मानसिक तणाव यामागे कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.










