आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपच्या नेहा राहुल काकडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अंतिम म्हणजेच नवव्या फेरीअखेर नेहा काकडे यांना एकूण २१ हजार मते मिळाली. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या परवीन खलिफा कुरेशी यांना १८ हजार ५३२ मते मिळाली, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या संगीता सोमनाथ गुरव यांना १४ हजार ४८६ मते मिळाली.
अंतिम निकालानुसार नेहा काकडे यांनी परवीन कुरेशी यांच्यावर २ हजार ४६८ मतांची स्पष्ट आघाडी घेत विजय निश्चित केला. तसेच शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार संगीता गुरव यांच्यापेक्षा काकडे यांनी तब्बल ६ हजार ५१४ मते अधिक घेतली. शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या उमेदवाराने शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवाराला मोठा फटका दिला. संपूर्ण प्रचारात जोरदार लढत अपेक्षित असतानाही शिवसेना उबाठा गटाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. यामुळे स्थानिक राजकारणात समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसून आले.
नगरसेवक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा पटकावत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. मात्र या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षानेही काही जागांवर बाजी मारत आपले अस्तित्व ठळक केले.
त्यामुळे आगामी काळात नगरपालिकेच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. एकूणच धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून आला असून नेहा काकडे यांच्या विजयामुळे पक्षाचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.









