आरंभ मराठी | धाराशिव
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी चार नगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीने झेंडा फडकावत सत्ता प्रस्थापित केल्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. या निकालातून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर ‘राणा दादाच किंग’ अशा पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण धुरा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक प्रभागाचा सखोल अभ्यास करून उमेदवार निश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
राजकारणातील नियोजनबद्ध रणनीतीत मल्हार पाटील यांचा सक्रीय सहभाग ठळकपणे दिसून आला.
विवाह सोहळा पार पडताच दुसऱ्याच दिवसापासून ते थेट प्रचारात उतरले. शहरातील विविध प्रभागांमध्ये प्रचारसभा, पदयात्रांच्या माध्यमातून त्यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचाराला धार दिली.
पक्षाची संघटनात्मक ताकद, अचूक नियोजन आणि मल्हार पाटील यांच्या प्रयत्नाने धाराशिव शहरात भाजपला यश मिळाल्याचे बोललो जात आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मल्हार पाटील यांनी बाळा, नाद करायचा नाही..!, असे स्टेटस ठेवत विरोधकांना थेट इशाराच दिला आहे. या घडामोडींमुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय वारशाची तिसरी पिढी आता प्रत्यक्ष राजकारणाची सूत्रे हाती घेत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
–
भाजप जिल्हाध्यक्षांचे अथक परिश्रम
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी नगरपालिका निवडणुकीत जोरदार नियोजन करून योग्य चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. राहुल काकडे हे कुलकर्णी यांचे निकटवर्तीय असून, त्यांनी राहुल काकडे यांच्या पत्नी नेहा काकडे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार यंत्रणा उभी केली. भाजपमध्ये जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांना त्यांनी एकत्र आणत त्यांनी धाराशिवच्या पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. सर्वसमावेशक भूमिका आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली.









