आरंभ मराठी / धाराशिव
मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन वाईन शॉप चालकाकडून खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तुळजापूर शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. वाईन शॉप चालकाला व त्याच्या मुलाला किडनॅप करण्याची धमकी देत पैसे आणि माल लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी अमर श्रीराम नाईक (वय ५२ वर्षे, रा. पंढरपूरकल गल्ली, तुळजापूर) हे तुळजापूर येथील जुने बसस्थानक परिसरात असलेल्या चेतन वाईन शॉपचे चालक आहेत. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.०० वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रशांत कांबळे, बालाजी जाधव आणि बाबा शेख (सर्व रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी वाईन शॉपवर येऊन फिर्यादी व त्यांच्या मुलाला धमकावले.
आरोपींनी फिर्यादीला व त्याच्या मुलाला किडनॅप करण्याची धमकी देत दुकानातून सुमारे ३,१०० रुपये किमतीचा माल जबरदस्तीने उचलून नेला. तसेच दर महिन्याला १०,००० रुपये हफ्ता दिला नाही, तर तुझ्या मुलाचे अपहरण करू, अशी गंभीर धमकी देत शिवीगाळ केली.
या घटनेनंतर फिर्यादी अमर नाईक यांनी दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 308(3), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात खळबळ उडाली आहे.









