आरंभ मराठी / धाराशिव
महानगर पालिकेच्या निकालापासून आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील असंख्य नेते,पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असून, त्यामुळे धाराशिव तालुक्यातही पक्षाला मोठा फटका बसत आहे. ऐन निवडणुकीत पक्षातील अनेक पदाधिकारी बाहेर पडत असल्याने पक्षाला खिंडार पडत आहे. धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथील श्याम जाधव, ढोकी येथील संग्राम देशमुख यांच्यानंतर आता आणखी एक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असून,त्यामुळे विशेषतः धाराशिव तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाची ताकद कमी होत आहे.
गेल्या आठवड्यातच ढोकी येथील तडफदार नेते संग्राम देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याआधी चिलवडी येथील श्याम जाधव यांनी शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला. अनेक गावातून पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असताना आता पक्षाचे उप जिल्हाप्रमुख आणि येडशी येथील माजी उपसरपंच विजय बापू सस्ते हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आजच सायंकाळी त्यांचा भाजप नेते आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान,यामुळे येडशीसह परिसरातील गावामध्ये भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार हे निश्चित.









