आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस असल्याने धाराशिव तहसील कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध गटांतील उमेदवार, समर्थक आणि राजकीय कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असतानाच दुपारी अर्चनाताई पाटील यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दुपारी सुमारे दीडच्या सुमारास अर्चनाताई पाटील या आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी केशेगाव आणि तेर या दोन जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दोन्ही अर्ज मागे घेतात की एकच अर्ज कायम ठेवतात, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
पावणेदोनच्या सुमारास अर्चनाताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतला. मात्र त्यांनी यावेळी एकाच गटातील उमेदवारी अर्ज मागे घेतला की दोन्ही अर्ज मागे घेतले याबद्दल मोठा ट्विस्ट निर्माण झाला. परंतु, अर्चनाताई पाटील यांनी फक्त केशेगाव गटातून माघार घेतली असून, तेर गटातून त्यांचा अर्ज कायम ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्चनाताई पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले होते. मात्र आज प्रत्यक्षात दोनपैकी केवळ एकच अर्ज मागे घेतला.
अर्ज मागे घेतल्यानंतर अर्चनाताई पाटील यांनी माध्यमास बोलण्यास नकार दिला. तहसील कार्यालय परिसरात उपस्थित असलेले शेकडो कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले आहेत. अर्चनाताई पाटील यांनी एकच उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्यामुळे ट्विस्ट निर्माण झाला आहे.









