आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतवस्तीवर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या कारवाईत दरोडा, जबरी चोरी व मोटरसायकल चोरी असे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून सुमारे २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यासंबधी सविस्तर माहिती अशी की, ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री कविता ज्ञानदेव कसबे (रा. उपळा शिवार) यांच्या शेतवस्तीवरील राहत्या घरात अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना मारहाण केली व सोन्याचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मोहा, ता. कळंब येथील पारधी पिढीवर छापा टाकून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उपळा शिवार येथील दरोड्याची कबुली दिली.
तसेच दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी धाराशिव येथील विमानतळ परिसरात दरोडा टाकल्याचे, तसेच गोळेगाव (ता. वाशी) आणि अंतरवली (ता. भूम) येथे चोरी केल्याचेही त्यांनी कबूल केले. पोलिसांनी आरोपींकडून सदर गुन्ह्यातील १६.२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, चोरीस वापरलेल्या व चोरीच्या ४ मोटरसायकली (शिर्डी व जामखेड येथील) हस्तगत केल्या आहेत. या कारवाईतून स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीचे एकूण ८ गुन्हे उघड केले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिल उर्फ लल्ल्या बादल शिंदे,
छगन श्रीपती काळे, बिभीषण उर्फ बबड्या दिलीप काळे, विजय उर्फ तुंबड्या आप्पा पवार (सर्व रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी आहेत. नमूद आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी धाराशिव तसेच इतर जिल्ह्यांतील दरोडा व जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, तसेच पो.ह. शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, मपो.ह. शोभा बांगर, चा.पो.ह. रत्नदीप डोंगरे, चा.पो.ह. नवनाथ गुरव यांनी सहभाग घेतला.









