आरंभ मराठी / धाराशिव
नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर स्वाधार मतिमंद मुलींचा निवासी प्रकल्प, आळणी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “आमचा वाढदिवस” या उपक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सपत्नीक सहभागी होत निरागस मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत नवीन वर्षाची सुरुवात केली. हा उपक्रम मनाला स्पर्श करणारा, माणुसकी जपणारा आणि अंतःकरण भारावून टाकणारा ठरल्याची भावना खासदार ओमराजे यांनी व्यक्त केली.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या, विशेष काळजीची गरज असलेल्या मतिमंद मुलींसाठी वाढदिवस साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश होते. हा कार्यक्रम केवळ केक कापण्यापुरता मर्यादित न राहता, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा एक सुंदर क्षण निर्माण करणारा ठरला.
आपलेपणाची ऊब, मायेचा स्पर्श आणि माणुसकीची भावना या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आली. या कार्यक्रमाला ओमराजेंनी सपत्नीक उपस्थित राहून मुलींच्या आनंदात सहभाग घेतला. यावेळी या सामाजिक कार्यामागील नेतृत्व करणारे शहाजी चव्हाण यांचे ओमराजेंनी विशेष कौतुक केले.
मतिमंद मुलींसाठी स्वाधारसारखे निवासी बालगृह उभारणे म्हणजे केवळ संस्था सुरू करणे नव्हे, तर समाजाने दुर्लक्षित केलेल्या आयुष्यांना आधार देणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्याची धाडसी जबाबदारी स्वीकारणे होय. शहाजी सरांचे कार्य म्हणजे सेवा नव्हे, तर माणुसकीची जिवंत शिकवण आहे.
त्यांच्या विचारातून आणि संवेदनशीलतेतून उभे राहिलेले हे बालगृह अनेक मुलींसाठी खऱ्या अर्थाने घर ठरले आहे अशी भावना ओमराजे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी श्रीमती भाग्यश्री पाटील (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, धाराशिव), तहसीलदार मृणाल जाधव, नायब तहसीलदार श्रीमती विशाखा बलकवडे, तसेच विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन वर्षाची सुरुवात अशा मानवतावादी आणि संवेदनशील उपक्रमाने होणे ही समाजासाठी आशेची, सकारात्मकतेची आणि प्रेरणादायी नवी पहाट ठरली आहे. हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता, समाजाच्या जाणीवेत कायम राहो, हीच सदिच्छा अशा भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केल्या.









