सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी व्हीआयपी सुविधेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असताना एका तोतया आयएएस अधिकाऱ्याचा बनावट बुरखा मंदिर कर्मचाऱ्यांनी फाडला आहे. काही वेळांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरात एकच खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील एक कुटुंब मंदिर कार्यालयात आले असता, त्यातील एका व्यक्तीने आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगत व्हीआयपी दर्शनाची मागणी केली. संशय आल्याने मंदिर कर्मचाऱ्यांनी ओळखपत्राची मागणी केली. त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नावाचे बनावट ओळखपत्र दाखवले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ सखोल चौकशी करताच हे ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. उलटतपासणीदरम्यान संबंधित व्यक्ती भांबावून गेला आणि पितळ उघडे पडले.
त्यानंतर त्याने व कुटुंबीयांनी माफी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र मंदिर प्रशासनाने तुळजापूर पोलिसांना पाचारण करून तोतया आयएएस अधिकारी व त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या ताब्यात दिले.या तोतयाने निखिल परमेश्वरी नावाचा आयएएस अधिकारी असल्याचे सांगून मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता.
प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीने विविध ठिकाणी बनावट ओळखपत्राचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून या घटनेने तुळजापूरात खळबळ उडाली आहे.












