आरंभ मराठी / कळंब
कळंब–लातूर रोडवरील खडकी नजीक सोमवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास अत्यंत भीषण आणि थरारक अपघात झाला. MH24 AS 0303 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला.
खडकी परिसरात रस्त्याच्या कडेला ऊसतोड कामगारांचे ट्रॅक्टर भरण्याचे काम सुरू असताना लातूरहून कळंबकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक नियंत्रण गमावले आणि थेट काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या दिशेने धाव घेतली.
या अपघातात सात ऊसतोड कामगारांना वाहनाने चिरडले, तर त्यापैकी दोघांना अक्षरशः फरपटत नेत रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ढकलण्यात आले. या भीषण धडकेत दोघांचे पाय गंभीररीत्या तुटले असून उर्वरित पाच जणही गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहन थेट खड्ड्यात जाऊन अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
यातील चार जखमींची तब्येत चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.







