आरंभ मराठी | धाराशिव
नगरपालिकांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील जनतेने स्पष्टपणे सत्ताधारी आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी सहा ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी सत्ता मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र धाराशिव आणि भूम येथे मतमोजणीची गती संथ असल्याने अंतिम निकालासाठी प्रतीक्षा वाढली आहे.
तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरुम या नगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. तुळजापूरमध्ये विजय गंगणे, नळदुर्गमध्ये बसवराज धरणे तर मुरुममध्ये बापुराव पाटील विजयी झाले आहेत. उमरगा नगरपालिकेत शिवसेनेने सत्ता हस्तगत करत किरण गायकवाड यांनी तब्बल ५९०० मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. कळंब येथे शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांनी बाजी मारली असून, परांडा येथे शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी निसटत्या फरकाने विजय मिळवला आहे.
भूम नगरपालिकेत अद्याप अटीतटीचा सामना रंगत असून प्रत्येक फेरीसोबत उत्सुकता वाढत आहे. धाराशिवमध्ये भाजप आघाडीवर असली तरी अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण निकाल पाहता सत्ताधाऱ्यांच्या बाजूने वातावरण असल्याचे चित्र स्पष्ट आहे.












