आरंभ मराठी / धाराशिव
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडित मुलीच्या भावाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की,
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
पीडित मुलगी (नाव व गाव गोपनीय) ही दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिच्या घरी येऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणास जाब विचारला असता, त्याने जातीवाचक शिवीगाळ करत पीडितेच्या भावास लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच इतर तीन तरुणांनीही एकत्र येत पीडितेच्या भावास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडितेने १७ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ६४, ६५, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच पोक्सो ॲक्टचे कलम ३(५) सह ४, ६ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(डब्ल्यू)(i)(ii), ३(२)(v), ३(१)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यात येत आहे.









