आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर येथे कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आठ जणांसह इतरांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंद होताच प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील विशेष पथक सक्रिय झाले आणि अवघ्या काही तासांत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी मंगळवारी (दि.१६) घटना घडल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष पथकाने केलेल्या कारवाईत चैतन शिंदे, शेखर गंगणे, नंदु गंगणे, अतुल दळवी आणि सोनू कदम या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त करण्यात येत होता.
यातील एक आरोपी आणखी फरार असल्यामुळे त्यालादेखील ताब्यात घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सात आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. मंगळवारी तुळजापूर शहरात कुलदीप मगर यांच्यावर अचानकपणे हल्ला करण्यात आला होता.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.









