आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रक्रिया सुरू असताना समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रसारित केल्याप्रकरणी अखेर सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उपमुख्याधिकारी विश्वंभर वासुदेवराव सोनखेडकर (वय 55, नगरपरिषद धाराशिव) यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये शासनातर्फे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी विश्वंभर सोनखेडकर हे 29 ऑक्टोबर 2025 पासून नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांची नियुक्ती मीडिया सर्व्हेलन्स कक्षातील सनियंत्रण अधिकारी म्हणून केली आहे.
या पदाच्या नात्याने ते निवडणूक आचारसंहिता व सोशल मीडिया नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत आहेत. दिनांक 1 डिसेंबर व 10 डिसेंबर 2025 रोजी अर्जदार राकेश हनुमंत सुर्यवंशी (तालुका प्रमुख, युवासेना धाराशिव) यांनी तसेच गोविंद कौलगे यांनी स्वतंत्रपणे लिखित तक्रारी दिल्या होत्या. तक्रारींमध्ये नमूद केले होते की, 30 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सात वाजता ‘Dharashiv 2.0’, ‘jilha dharashiv’ आणि ‘all about_dharashiv’ या सोशल मीडिया पेजवर धाराशिव नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात बनावट एक्झिट पोल प्रसारित करण्यात आला.
या व्हिडिओमध्ये एका बनावट (bogus) टीव्ही चॅनलचा वापर करून भाजप उमेदवार नेहा काकडे या विजयी ठरणार असल्याचे भासविले तसेच
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दाखविले असल्याचा दावा करण्यात आला आहे. मतदानापूर्वी एक्झिट पोल प्रसारित करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे व आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन असल्याने या प्रकरणी शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले.
दिनांक 9 डिसेंबर 2025 नुसार उपमुख्याधिकाऱ्यांना अधिकृतरीत्या तक्रार नोंदवण्याचे अधिकार देण्यात आले. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 कलम 126(1)(ख) नुसार मतदानापूर्वी चलचित्र, दूरचित्रवाणी किंवा तत्सम माध्यमातून निवडणूक विषयक सामग्री प्रदर्शित करणे प्रतिबंधित आहे.
या तरतुदीचा भंग करून अज्ञात व्यक्तीने सोशल मिडियावर बनावट एक्झिट पोल तयार करून प्रसारित केला असून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. उपमुख्याधिकारी सोनखेडकर यांनी सायबर पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत संबंधित सोशल मीडिया चॅनेलविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.









