माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांची प्रतिक्रिया
आरंभ मराठी / धाराशिव
देशाचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची वार्ता समजताच राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकारणातील त्यांच्या विशाल अनुभवाने, सभ्य वर्तणुकीने आणि माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वगुणांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.
या दुःखद प्रसंगी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. निवडणुकीत आम्ही परस्परांच्या विरोधात उभे राहिलो, पण व्यक्तिगत नात्यातील आपुलकी, स्नेह आणि परस्परांचा मान हे बंध नेहमीच अबाधित राहिले, असे सांगत त्यांनी दिवंगत नेत्यांच्या मोठेपणाची आठवण करून दिली.
त्यांनी म्हटले की, मतभेदांच्या पलीकडे माणुसकी जपणारे, सर्वांना जोडून ठेवणारे आणि प्रेमाने वागणारे नेते म्हणजे चाकूरकर साहेब. त्यांच्या मार्गदर्शनाची, सौजन्याची आणि विशाल हृदयाची कमतरता सदैव जाणवेल.
चाकूरकर कुटुंबीयांप्रती आणि अनुयायांप्रती संवेदना व्यक्त करताना त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली. राजकारणात विरोध असला तरी वैयक्तिक जीवनात मैत्रीपूर्ण संबंध जपला जात होता.









