आरंभ मराठी / धाराशिव
पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सर्व पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग वाढली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून सर्वाधिक प्रतिसाद भाजपला मिळाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत भाजपकडे तब्बल अडीच हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे इतर पक्षांतील काही कार्यकर्त्यांनीही भाजपकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्याचे समजते. अशातच एका अर्जामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे माजी मंत्री आणि भूम–परंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी (दि.१०) पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर डॉ. तानाजीराव सावंत यांच्या जे.एस.पी.एम. संस्थेची गाडी येऊन थांबली. या गाडीत संस्थेतील काही कर्मचारी होते. गाडीतून उतरताच त्यांच्या हातात गिरीराज सावंत यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज दिसला. काही वेळातच त्यांनी हा अर्ज भाजप कार्यालयात जमा केला आणि तत्काळ तेथून निघून गेले. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ३८ मधून गिरीराज सावंत यांच्या नावाने भाजपकडे अधिकृतरीत्या अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे आता ते भाजपात प्रवेश करणार का? तसेच महापालिकेची निवडणूक लढवणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुत्र थेट पुण्यातून राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घडामोडींमुळे सावंत घराण्याची पुणे राजकारणातील एन्ट्री निश्चित मानली जात आहे.
पुढील काही दिवसांत भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होईल. तेव्हा या अर्जाचे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉ तानाजीराव सावंत हे शिवसेनेतील वजनदार नेते आहेत. त्यांनी अडीच वर्ष आरोग्यमंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये काम केले आहे. यावेळी त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागली नसल्यामुळे ते नाराज आहेत अशा चर्चा होतात. त्यातच त्यांच्या मुलाने भाजपमधून उमेदवारी मागितल्यामुळे पुन्हा एकदा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नाराजीची चर्चा होत आहे.









