आरंभ मराठी / धाराशिव
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. निवडणूक आयोगाने यंदा प्रचारबंदीच्या नियमामध्ये बदल करत मतदानाच्या आदल्या दिवशीही रात्री 10 वाजेपर्यंत जाहीर प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांच्या प्रचाराला मोठी गती मिळणार आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार नेहमीप्रमाणे मतदानाच्या दोन दिवस आधी प्रचारबंदी लागू होते. मात्र अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन यावेळी आयोगाने नव्याने आदेश प्रसिद्ध केले आहेत.
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत तीन उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जांवर कोर्टात सुनावणी सुरू असल्याने अपक्ष उमेदवारांना चिन्ह मिळण्यात दोन दिवस विलंब झाला. परिणामी त्यांना मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी फक्त तीन दिवसच उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर आयोगाने घेतलेला निर्णय अपक्षांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास परवानगी मिळाल्याने उमेदवारांनी प्रचारमोहीम आणखी तीव्र करण्याची तयारी सुरु केली आहे. मोठे पक्ष, आघाड्या तसेच स्वतंत्र उमेदवार या सर्वांना याचा लाभ होणार असून स्थानिक पातळीवरील स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे.अपक्ष उमेदवारांना चिन्ह मिळण्यात झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेली अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.
प्रचारासाठी अतिरिक्त दिवस मिळाल्याने सर्वच पक्षांच्या मोहिमा वेगात येण्याची शक्यता आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना आयोगाच्या निर्णयामुळे प्रचाराला नवी उभारी मिळाली असून नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.









