आरंभ मराठी / धाराशिव
नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे तीन दिवस शिल्लक असताना धाराशिव शहरात भाजप–शिवसेना महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. सुरुवातीला महायुती कायम असल्याच्या भूमिकेमुळे शिवसेनेने धाराशिव शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता.
मात्र, भाजपकडून केवळ चार जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी थेट आमदार राणा पाटील आणि भाजपवर टीकास्त्र सोडत, शिवसेनेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका केली होती. त्यानंतर जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतर्फे काही अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केल्याची घोषणा केली. परंतु, नगराध्यक्ष पदाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर न झाल्याने शिवसैनिकांत संभ्रम कायम आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आमदार राणा पाटील यांच्या सुपुत्राच्या विवाहानिमित्त जिल्ह्यात आले असता त्यांनी जिल्हाप्रमुखांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करून, महायुतीत सर्व काही सुरळीत आहे, असे प्रतिपादन केले होते. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्र निर्माण झाला आहे.
पालकमंत्र्यांचा दोन दिवसांचा दौरा – जाहीर सभा, बैठकांमुळे वाढली उत्सुकता –
आजपासून पालकमंत्री प्रताप सरनाईक हे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उमरगा, धाराशिव आणि कळंब शहरात जाहीर सभा घेणार आहेत.
आजचे वेळापत्रक :
सायं. ५.०० वाजता – छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमरगा येथे जाहीर सभा
रात्री ८.३० वाजता – राजमाता जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव येथे सभा
मुक्काम – तुळजापूर; शिवसेना कार्यकर्त्यांसोबत खास बैठक आणि चर्चा
शनिवारचा कार्यक्रम :
सकाळी १०.४५ – स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, कळंब येथे जाहीर सभा
दुपारी १२.०० – मोटारीने धाराशिवकडे प्रस्थान
दुपारी १.०० – धाराशिव बस डेपोची पाहणी
विद्यार्थ्यांशी संवाद – परिवहन महामंडळाकडून नव्याने सुरू हेल्पलाइन सेवेसंदर्भात विद्यार्थ्यांशी थेट चर्चा
यानंतर पालकमंत्री सोलापूर मार्गे विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
धाराशिव शहरातील अनेक प्रभागांत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत असून, महायुतीचे चित्र स्पष्टपणे तुटलेले दिसत आहे. शिवसेनेकडून पुरस्कृत केलेल्या काही अपक्ष उमेदवारांनाही भाजपाच्या विरोधात उमेदवारी मिळाल्याने संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आजच्या जाहीर सभांमध्ये शिवसेनेच्या अधिकृत भूमिकेबाबत काय संकेत देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांची सध्याची भूमिका पाहता ते भाजपाचे अधिकृत उमेदवार नेहा काकडे यांनाच पाठिंबा देण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देतील अशी शक्यता वाटत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील तणाव आणि शिवसेनेच्या अस्पष्ट भूमिकेमुळे धाराशिवच्या राजकारणात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. आज आणि उद्याचे पालकमंत्र्यांचे कार्यक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.









