आरंभ मराठी / धाराशिव
आळणी गावात बनावट दस्त तयार करून शासनाच्या शौचालय अनुदानाचा फायदा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सरपंचासह सात जणांविरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच जंगम मठाच्या जमिनीवर कब्जा घेऊन त्या जमिनीचेही बनावट दस्त तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी अंबऋषी अर्जुन कोरे (वय 62, रा. आळणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महानंदा संतोष चौगुले (वय 35, सरपंच), सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड (वय 50, ग्रामसेवक, रा. चोराखळी ता. कळंब), बबन विठ्ठल माळी (वय 64), गयाबाई बबन माळी (वय 60), धनंजय बबन माळी (वय 45), तानाजी विठ्ठल माळी (वय 50) आणि फुलचंद सदाशिव माळी (वय 40), सर्व रा. आळणी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
सन 2016 ते 2021 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. या बनावट दस्तांच्या आधारे शौचालयाचे अनुदान काढून घेत शासनाची फसवणूक केली. याशिवाय जंगम मठाच्या मालकीच्या जमिनीवर अनधिकृतरीत्या कब्जा करून त्या जमिनीचेही बनावट दस्त तयार केले. या दस्तांच्या आधारे शासनाकडून अनुदान उचलून शासकीय निधीचा अपहार केल्याचे तपासात दिसून आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश मा. न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, धाराशिव यांनी बीएनएसएस कलम 175(3) नुसार दिले होते. त्यानुसार 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्राप्त प्रथम खबर नोंदवून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.संहिता कलम 316(5), 318(4), 338(3), 336(3) आणि 340(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.









