आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून अर्जाची छाननी मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. छाननीनंतर किती अर्ज पात्र झाले आणि किती अर्ज अपात्र झाले याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नामनिर्देशन पत्राचा तक्ता प्रशासनाने प्रसिद्ध केला असून त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी एकूण 34 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.
त्यापैकी 20 उमेदवारी अर्ज अपात्र झाले असून, सध्या नगराध्यक्ष पदासाठी 14 उमेदवारी अर्ज पात्र झाले आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी 20 प्रभागातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. नगरसेवक पदासाठी एकूण 568 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी नंतर त्यातील तब्बल 241 उमेदवारी अर्ज अपात्र झाले असून आता वीस प्रभागातून एकूण 327 उमेदवारी अर्ज पात्र झालेली आहेत.


सध्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकूण पात्र झालेल्या अर्जांची संख्या 341 इतकी आहे. नगरसेवकांच्या अपात्र झालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक अपात्र झालेले अर्ज प्रभाग क्रमांक 8 अ मधील असून त्याची संख्या 16 इतकी आहे. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक 20 ब मधून 13 उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहेत. प्रभाग क्रमांक 1 अ मधून 12 उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत.
विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 12 अ मधून एकाही उमेदवाराचा अर्ज अपात्र झालेला नसून या प्रभागात दाखल झालेले दोन्ही अर्ज पात्र झालेले आहेत. नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर प्रभाग क्रमांक 4 अ, 7 ब, 12 अ आणि 19 क या प्रभागात दोनच उमेदवारांमध्ये लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. छाननी नंतर सर्वाधिक उमेदवार प्रभाग क्रमांक 1 ब, 14 अ आणि 15 अ मध्ये प्रत्येकी 15 उमेदवार रिंगणात आहेत. त्या खालोखाल 14 उमेदवार 4 ब मध्ये आहेत. यामधे आक्षेप घेण्यात आलेल्या 8 उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला नसून त्यांचा अंतिम निर्णय येणे बाकी आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.









