आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 40 वर्षे हुकूमत गाजविणारे माजी मंत्री,ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या तिसऱ्या पिढीने आता राजकीय सूत्र ताब्यात घेतली आहेत. धाराशिव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संपूर्ण ताकदीने रिंगणात उतरताना तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील हे केंद्रबिंदू बनले असून, या निवडणुकीतूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची अधिकृत सुरूवात होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखतींपासून ते उमेदवारांची अंतिम निवड आणि एबी फॉर्मचे वितरण या संपूर्ण प्रक्रियेत मल्हार पाटील यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तर ते स्वतः एबी फॉर्म घेऊन नगरपालिकेत उपस्थित होते. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही त्यांची छाप अधिक ठळक झाली आहे. धाराशिव नगरपालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात असून, नगराध्यक्षपदासह जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपकडून आक्रमक रणनीती आखण्यात आली आहे.
पक्षाने निवडणुकीचे सूत्र तरुणांच्या हाती देत नवा प्रयोग केला असून, त्यात मल्हार पाटील अग्रस्थानी आहेत. दरम्यान, मल्हार पाटील यांची सोशल मीडिया टीम देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली आहे. सोशल मीडियावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या विरोधात टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
धाराशिवची ही निवडणूक मल्हार पाटील यांच्यासाठी राजकीय कारकिर्दीचा ‘श्रीगणेशा’ करण्याची मोठी संधी मानली जाते. ही संधीचे रुपांतर सोन्यात होते का, याचा निकाल ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.मात्र, यानिमित्ताने डॉ. पद्मसिंह पाटलांच्या तिसऱ्या पिढीने आता सक्रिय राजकारणात उडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.









