आरंभ मराठी / धाराशिव
नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असून, या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांच्या हालचाली वाढल्या असून, रात्रीतून अनेकांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला.शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर अनेक पक्षातील नाराज इच्छुकांनी राष्ट्रवादीची तुतारी फुंकली आहे.
शिवसेना उबाठा गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. पण सर्वच इच्छुकांना संधी मिळत नाही. पण त्यातून नाराजी नाट्य निर्माण झाले आहे.
विविध पक्षांमध्ये उमेदवारांची अधिकृत घोषणा अंतिम टप्प्यात असून, तिकिट मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या काही इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांना संधी न देता आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याची चर्चा सुरू आहे. या निर्णयाविरोधात अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला.
रात्रीतून मोठे पक्षांतर, स्थानिक राजकारणात खळबळ
शहरातील विविध प्रभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा, बैठका आणि हालचाली सुरू राहिल्या. अनेक जणांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात औपचारिक प्रवेश करत आपले राजकीय स्थान बदलले. काही प्रभागांमध्ये तर एकाच वेळी दोन-तीन गटांनी भूमिका बदलल्यामुळे राजकीय आकडेमोड पुन्हा नव्याने मांडावी लागेल, अशी परिस्थिती दिसून आली.
निष्ठावान कार्यकर्ते नाराज, नेतृत्वासमोर अडचण
आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न केल्याची टीका होत आहे. त्यामुळे पार्टी नेतृत्वाला अचानक उद्भवलेल्या या असंतोषाचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची स्वतंत्र भूमिका, आघाडीत दरी
एकीकडे उमेदवार निवडीचे राजकारण तापलेले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने ‘स्वतंत्र भूमिका’ स्वीकारून निवडणूक लढविण्यचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर फूट पडली आहे. आघाडीतील समन्वयाचे प्रयत्न अपुरे ठरल्याची चर्चा आहे.









