आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी प्रक्रियेला अखेर गती मिळणार असून राज्य सरकारकडून जिल्हानिहाय पिक उत्पादकता जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून सोयाबीन हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती.
तसेच १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे हेक्टरी किती सोयाबीन खरेदी करायचे, याबाबत निर्णय न झाल्याने खरेदी केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र चालकांसह शेतकऱ्यांनाही नेमकी खरेदी क्षमता न ठरल्याने अडचणी येत होत्या.
जिल्हा पणन अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले होते की राज्य सरकारकडून अधिकृत उत्पादकता जाहीर होईपर्यंत खरेदीची मर्यादा निश्चित करता येणार नाही.
दरम्यान, राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याची पिक उत्पादकता जाहीर केली असून धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनची प्रति हेक्टर उत्पादकता १७ क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
यामुळे नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १७ क्विंटलपर्यंत सोयाबीन हमीभाव केंद्रावर विकण्याची परवानगी राहणार आहे. जिल्ह्यातील ३१ खरेदी केंद्रांवर ५३२८ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जाणार असून यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळते.
उत्पादकता जाहीर करण्यात उशीर झाल्याने १५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष खरेदी सुरू होऊ शकली नव्हती. मात्र आता उत्पादकता स्पष्ट झाल्याने खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय ठरला असून आजपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









