आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत शनिवारी सहाव्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडल्याचे चित्र दिसले. शनिवारीच नगराध्यक्ष पदासाठी ८ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
पहिल्या पाच दिवसात २८ अर्ज दाखल झाले होते; मात्र सहाव्या दिवशीच मोठी राजकीय हालचाल वाढल्यामुळे अर्ज संख्येत मोठी उसळी पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक ५ अर्ज भाजपकडून दाखल झाले. यावरून पक्षाच्या अंतर्गत तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडून छाया पांडुरंग लाटे, वर्षा युवराज नळे, शर्मिला संभाजी सलगर, ज्योती पापालाल भोई आणि मीनाक्षी संभाजी धत्तुरे यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून राधिका धनंजय राऊत तर एमआयएम आणि अपक्ष म्हणून पठाण हाजराबी मैनोद्दीन यांनी अर्ज दाखल केले.
नगरसेवक पदासाठीही अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसली. यामधे भाजप – 21, शिवसेना (उबाठा) – 15, काँग्रेस – 5, शिवसेना – 3, राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 5, राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 3, एमआयएम – 1 आणि अपक्ष – 16 असे एकूण 69 अर्ज दाखल झाले. शुक्रवारी 23 अर्ज दाखल झाले होते.
यामुळे सहाव्या दिवसापर्यंत अर्जांची एकूण संख्या झपाट्याने वाढून निवडणूक रंगात येत असल्याचे स्पष्ट झाले. आता फक्त दोन दिवस शिल्लक असताना प्रमुख पक्षांनी उमेदवार अंतिम करण्यासाठी वेग वाढविला आहे. पक्षांतर्गत तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांची धडपडही दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, शनिवारी पती-पत्नीच्या एका जोडीने नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी चार अशा एकूण सहा अर्जांचा भरणा केला, ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यामध्ये पतीने काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम आणि अपक्ष असे चार वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच काही उमेदवारांनी एकाच प्रभागातून दोन किंवा अधिक पक्षांतून अर्ज दाखल करून राजकीय समीकरणात गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे. आता पुढील दोन दिवसांत राजकीय पक्षांतर्फे मोठ्या हालचाली होण्याची शक्यता असून, शहरातील निवडणुकीचे वातावरण आणखी तापणार आहे.









