आरंभ मराठी / उमरगा
उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी येथील 65 वर्षीय शेतकरी गोविंद विश्वनाथ लवटे यांनी जमीन व्यवहारातील वादातून नैराश्यात येऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताबाई श्रीमंत बाचके यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उमरगा पोलिसांनी दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गोविंद लवटे यांनी आरोपीच्या पतीकडून पाच लाख रुपये घेऊन दीड एकर शेत तोंडी कराराने दिले होते. नंतर गोविंद यांनी उसने घेतलेले पैसे परत देऊन जमीन परत मागितली. मात्र, आरोपीने जमीन परत देण्यास नकार दिल्याने ते नैराश्यात गेले होते.
दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांनी बोरीच्या झाडास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मयतांचा मुलगा काशिनाथ गोविंद लवटे (वय 26) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 108 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. उमरगा पोलिस पुढील तपास करत आहेत.









