आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, जागावाटपावर निर्णयाची अपेक्षा
नगराध्यक्षपदासाठी गुरव, बंडगर आणि काकडे यांची मागणी
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर परिषद निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. सर्व पक्षांमध्ये अंतर्गत बैठका सुरू आहेत. शिवसेनेमध्ये (उबाठा गट) इच्छुकांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी दिवसभर चाललेल्या मुलाखतींचा सिलसिला रात्री तब्बल 2 वाजेपर्यंत सुरुच होता. नगरसेवक पदासाठी तब्बल 150 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. तर नगराध्यक्षपदासाठी तीन महिला इच्छुक असून, त्यात संगीता सोमनाथ गुरव, लक्ष्मी दत्ता बंडगर आणि वर्षा श्रीमंत काकडे यांचा समावेश आहे.
नगरसेवकपदासाठीच्या मुलाखतीदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी प्रत्येक इच्छुकाशी संवाद साधत त्यांची भूमिका जाणून घेतली.
धाराशिव शहरातील एकूण जागांबाबत आज राजे कॉम्प्लेक्समध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
जागावाटप ठरल्यानंतर उद्या किंवा परवा महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षपदासाठी तीन महिला इच्छुक; शहराचे लक्ष शिवसेनेवर
शिवसेना उबाठा गटामध्ये नगराध्यक्षपदासाठीही तीन महिला इच्छुकांची नावे पुढे आली असून, या पदासाठी कोणाला हिरवा कंदील मिळणार, याकडे शहरवासीयांसह महायुतीचेही लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीची भूमिका आणि शिवसेनेची ताकद
शिवसेना उबाठा गटाने महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर काँग्रेसनेही समान भूमिका घेतली.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) नगराध्यक्षपदाची जागा आपल्या वाट्याला मिळावी,यासाठी शिवसेनेवर दबाव आणत आहे. मात्र, तुलनेने धाराशिव शहरात राष्ट्रवादीची ताकद कमी असल्याने आघाडीत शिवसेनाच मोठा भाऊ मानला जात आहे. त्यामुळे अंतिम निर्णय शिवसेना नेत्यांच्या हातात राहण्याची चिन्हे आहेत.
अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस
अर्ज दाखल करण्यासाठी येत्या सोमवारी शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.राजकीय समीकरण लक्षात घेता महाविकास आघाडी उमेदवारी अंतिम करण्याचे काम वेगाने करणार असल्याचे संकेत आहेत.
आजच्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा आणि कोणत्या प्रभागात तिकीट मिळणार यावर उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल.









