धाराशिव जिल्ह्याचे काय होणार..?, उपजिल्हाधिकाऱ्यांपासून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात जिल्ह्याची सूत्रं
भ्रष्ट अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ?
आरंभ मराठी / धाराशिव
एक वादग्रस्त भ्रष्ट उपजिल्हाधिकारी बदलून गेले की त्यांच्या जागी त्याहून अधिक भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांची निवड केली जाते, हे प्रकार जिल्ह्यासाठी लांछन आहेत. वादग्रस्त पार्श्वभूमी आणि असलेल्या शोभा जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यांची नुकतीच परभणीला बदली झाली.
पण कहर म्हणजे त्यांच्या जागी चार महिन्यापूर्वीच निलंबित झालेले उदय किसवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कहर म्हणजे धाराशिवचे दुसरे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्यासह नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे वेगवेगळ्या भ्रष्ट मार्गाने माया जमवणारे किंवा लाच घेताना अडकलेले अधिकारी कार्यरत आहेत.
किंबहुना निलंबित होऊन पुन्हा सेवेत पदोन्नती मिळवून काही अधिकारी अजूनही संशयास्पद पद्धतीने बिनधास्त कारभार करत आहेत. हा सगळा प्रकार सुरू असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत हे विशेष. वादग्रस्त निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची नुकतीच बदली झाली.
त्यांच्या जागी कोण नवीन अधिकारी येणार याची उत्सुकता असतानाच उदय किसवे यांची त्यांच्या जागी नियुक्ती झाल्याची बातमी आली. एका निलंबित अधिकाऱ्याला धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा भार दिल्यामुळे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन आणि गुगळगाव येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी उदय किसवे यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुलै महिन्यात निलंबित केले होते.उदय किसवे यांचे निलंबन केल्यानंतर मागील चार महिन्यांपासून त्यांना कुठेही नियुक्ती देण्यात आली नव्हती.
धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची शुक्रवारी (दि.७) अचानक परभणी येथे बदली करण्यात आल्यानंतर उदय किसवे यांची नियुक्ती धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. सध्या धाराशिव जिल्ह्यात दोन उपजिल्हाधिकारी आणि एक तहसीलदार यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
सध्या निवडणूक विभागात कार्यरत असलेले शिरीष यादव आणि सामान्य प्रशासन विभागातील उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने यापूर्वी कारवाई केलेली आहे. तसेच धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचीही कारकीर्द अशीच वादग्रस्त आहे. त्यांच्यावर देखील बेहिशोबी संपत्ती गोळा केल्यासंबधी आरोप करण्यात आलेले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
धाराशिवचे मुख्याधिकारी राहिलेले येलगट्टे हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जेलची हवा खाऊन आले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर मुख्याधिकारी म्हणून आलेल्या वसुधा फड यांचेही नाव कोट्यवधींच्या घोटाळ्यात घेतले जात आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.
त्यानंतर मुख्याधिकारी म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या नीता अंधारे यांच्यावर तीनच महिन्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाने नगरोत्थाण योजनेत दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. एकूणच धाराशिव जिल्ह्यात असे वादग्रस्त अधिकारी येत असतील तर शहर आणि जिल्ह्याचे कसे होणार? हा प्रश्न निर्माण होत आहे.









