संजय दुधगावकर, संजय निंबाळकरांपाठोपाठ जगदाळेंनी पक्ष सोडला
आरंभ मराठी / धाराशिव
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धाराशिव जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नळदुर्गचे ज्येष्ठ नेते अशोक जगदाळे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, लवकरच नळदुर्गमध्ये भव्य स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
याआधी माजी आमदार राहुल मोटे, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम केला होता. त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शरद पवार गटाची ताकद अधिकच कमी झाल्याचे चित्र आहे.
धाराशिव जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता. परंतु आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाची स्थिती डळमळीत झाली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटात विभागणी झाल्याने दोन्ही गटांची ताकद हळूहळू कमी होत चालली आहे.
अलीकडेच भूम-परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता, तर गेल्या आठवड्यातच संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम केला. आता अशोक जगदाळे यांच्या पक्षांतरामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षांतरामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.









