आरंभ मराठी / परंडा
भूम तालुक्यातील आंतरगाव येथे कोर्टातील प्रकरणाचा निकाल आपल्या विरोधात लागल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर तणनाशक फवारून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश शिवाजी लोद, गणेश शिवाजी लोद आणि शिवाजी देवराव लोद (सर्व रा. आंतरगाव, ता. भूम) यांनी फिर्यादी प्रशांत त्रिंबक गोरे (वय ४९ वर्षे, रा. आंतरगाव) यांच्या कोर्टातील प्रकरणाचा निकाल आपल्या विरोधात लागल्याच्या रागातून सूडभावनेने हा प्रकार केला. दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी गोरे यांच्या आंतरगाव शिवारातील (गट क्र. १६१) द्राक्षबागेत शिरून आरोपींनी तणनाशकाची फवारणी बागेवर केली.
त्यामुळे बागेतील सुमारे ४०५ झाडे पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्याचे अंदाजे ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर फिर्यादी प्रशांत गोरे यांनी दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३२४(५) तसेच आकस्मिक गुन्हे प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.









