येलगट्टे-वसुधा फड यांच्यापाठोपाठ धारशिवला तिसरा वादग्रस्त, भ्रष्ट अधिकारी
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील १४० कोटींच्या नगरोत्थान योजनेतून मंजुरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामात दोन ते अडीच कोटी रुपयांची अफरातफर झाली असून, याप्रकरणात धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला.
रस्त्यांच्या कामात संबंधित गुत्तेदार, मुख्याधिकारी अंधारे आणि इतर अधिकारी यांची मुंबईत कोठे आणि कधी बैठक झाली, त्यामध्ये कसे आर्थिक व्यवहार झाले यासंबधी सविस्तर माहिती आपल्याकडे असून, ती माहिती उघड करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. लाडक्या गुत्तेदाराला काम मिळावे यासाठी भाजपा सोबत अधिकारी देखील सहभागी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामावरून पुन्हा एकदा राजकारण पेटले असून, शिवसेना (उबाठा) आणि भाजप यांच्यातील वाद आता महायुतीमधीलच शिवसेना (शिंदेगट) आणि भाजप यांच्यात सुरू झाला आहे. शिवसेनेने शुक्रवारी (दि.३१) पत्रकार परिषद घेऊन सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर परखड शब्दात टीका केली. तसेच यावेळी धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर आर्थिक व्यवहार केल्याचे गंभीर आरोप केले.
अजमेरा या गुत्तेदाराला हे रस्त्याचे काम देण्यासाठी मुख्याधिकारी नीता अंधारे आणि इतर अधिकाऱ्यांनी मुंबईत बैठक घेतली. तिथेच दोन ते अडीच कोटींचे रोख आर्थिक व्यवहार केल्याचे साळुंखे म्हणाले. यावेळी त्यांनी सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर देखील परखड शब्दात टीका केली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव शहरासाठी १४० कोटींचे रस्ते मंजूर केले होते.
मात्र, भाजपच्या आमदारांनी शहरभर होर्डिंग्ज लावून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस १४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यासाठी मंत्री महोदयांचे आभार मानायला पाहिजे होते.
परंतु, रस्त्याचे काम मर्जीतल्या लाडक्या गुत्तेदाराला १५ टक्के जादा दराने देण्याचा घाट भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला. या कामाच्या अनुषंगाने लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून याबाबत निवेदन देवून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१४० कोटी रूपयांच्या कामात मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि लाडका गुत्तेदार यांची मुंबई येथे बैठक कुठे झाली? आणि त्यांच्यामध्ये रोख दोन कोटी रूपयांची ‘डील’ झाली याचीही माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये असेही यावेळी साळुंके यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे संघटक सुधीर पाटील, शहरप्रमुख आकाश कोकाटे, डी. एन. कोळी उपस्थित होते.
कामे झालेल्या रस्त्यांचेच पुन्हा टेंडर –
धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची काही कामे यापूर्वीच झालेली आहेत. तरी देखील त्याच रस्त्याच्या कामाचे टेंडर पुन्हा काढण्याचे कारण काय? असा सवाल करीत निधीचा दुरूपयोग करण्याचे पाप नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि भाजपा, उबाठा गटाचे लोक करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे शहराचा सत्यानाश केला, आगामी निवडणूक समोर ठेवून सुरू असलेला हा खेळ जनता ओळखून आहे. त्यामुळे असे राजकारण चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्थगिती दिलेल्या दिवशीच पालिकेकडून मुद्दाम फोटोसेशन –
रस्त्यांच्या कामांना दिनांक २८ ऑक्टोबर रोजी स्थगिती देण्यात आल्याचे पत्र मुख्याधिकारी यांना दिले होते. तरीही त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर जाऊन जेसीबी आणि इतर मशिनरीसह काम सुरू झाल्याचे भासवण्यासाठी फोटोसेशन केले. गुत्तेदाराला कोर्टात जाऊन स्थगिती उठवता यावी यासाठी पालिका प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सुरज साळुंखे यांनी यावेळी केला.
महायुतीत वाद, शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची घोषणा –
१४० कोटींच्या रस्त्यांच्या कामावरून महायुतीतील भाजपा आणि शिवसेना पक्षात वितुष्ट निर्माण झाले असून, आगामी नगरपालिका निवडणुका शिवसेना महायुतीत न लढता स्वतंत्र लढेल अशी घोषणा सुधीर पाटील यांनी यावेळी केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार असून, आमची स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे सुधीर पाटील आणि सुरज साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले.









