आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री जॅक टाकून प्रवाशांच्या गाड्या बंद पाडून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात महामार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या.
त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यातच १६ ऑक्टोबर २०२५ रोजी उमरगा–सोलापूर महामार्गावर एका डॉक्टरांच्या कुटुंबावर दरोडा टाकण्याची घटना घडली होती. याबाबत डॉ. अब्दुल गफूर अब्दुल रऊफ जनैदी यांनी मुरूम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांना तपासाची जबाबदारी सोपवली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास करून तसेच पारंपरिक तपास पद्धतीचा अवलंब करत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांनी
अर्जुन बालाजी शिंदे आणि आशोक हिरामन शिंदे या दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी आणखी चार साथीदारांसह मुरूम येथील महामार्गावरील दरोड्याची कबुली दिली. तसेच त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातही अशाच प्रकारे ट्रक थांबवून लूट केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली XUV500 गाडी, जॅक, तसेच जळगावातील दरोड्यात वापरलेला ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, स.पो.नि. सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, शोभा बांगर, फरहान पठाण, राठोड, तसेच चालक अंमलदार सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली.
या संपूर्ण कामगिरीत QRT आणि RCP पथकांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.









