सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांकडे बोट,
140 कोटींच्या विकास कामांचा अध्याय अपूर्ण, भुयारी गटार योजना नागरिकांच्या मुळावर, शहराची बकाल अवस्था
आरंभ मराठी / धाराशिव
नगरपालिकेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून, आता इच्छुक चेहरे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत धाराशिव शहराची अवस्था बकाल करून टाकण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मतदान करायचे की विरोधकांना..?, शहर खड्ड्यात घालण्यासाठी कोण जबाबदार आहेत, सत्ताधारी की विरोधक याबाबतची उत्तरे नागरिकांना देता येणार नाहीत.
कारण सत्ताधारी आणि विरोधकांनी रखडलेल्या विकासाबाबत एकमेकांकडे बोट दाखवत नागरिकांना कन्फ्युज करून टाकले आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन दूर करून विकासाच्या मारेकऱ्यांना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न धाराशिवकरांना करावा लागणार आहे.
शहर विकासाच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. नगरोत्थानमधील १४० कोटींची प्रलंबित कामे आणि जिल्हा नियोजन समितीच्या ब्रेक लागलेल्या योजनांचा विषय आता महायुतीच्या अंतर्गत राजकारणाचाही केंद्रबिंदू बनला आहे.
राजमाता जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज चौक हा रस्ता म्हणजे विकासाऐवजी अवनती आहे.
रस्त्यावर खड्डे, चिखल आणि दुर्गंधीतून प्रवास. माध्यमांनी, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलने केली, पण प्रशासन कानाडोळा करत राहिले. आम्हाला रस्ता द्या, म्हणणाऱ्या आंदोलन करणाऱ्या मुलांच्या घोषणांनी अधिकाऱ्यांची झोप मोडलेली नाही.
सत्ताधारी विरुद्ध विरोधक: आरोपांचा महापूर
विकासकामे रखडली म्हणून विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत, तर सत्ताधारी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात कामे झाली नाहीत, हे सांगण्यात मश्गूल आहे. आम्ही योजना आणल्या, त्यांनी रोखल्या आणि त्यांनी निधी अडवला, अशा आरोप प्रत्यारोपांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक सुद्धा गाजली. परंतु विकासात बदल दिसला नाही.
३ वर्षांपासून पालिकेला लोकनियुक्त मंडळ नाही
लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने अधिकारीच शहर चालवतात, आणि हाच सर्वनाशाचा पाया ठरत आहे. निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने कोणी हिशोब मागत नाही, कोणी उत्तरदायित्व घेत नाही. त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही हीच अधिकाऱ्यांची वृत्ती वाढत गेली. नगरपालिकेसाठी इच्छुक चेहऱ्यांनी समाज माध्यमांवर आता प्रचंड गर्दी केली आहे. मात्र गेल्या तीन वर्षात हे चेहरे प्रामाणिकपणे आपापल्या प्रभागात जनतेसाठी उभे राहताना दिसले नाहीत. त्यामुळे शहराची केविलवाणी अवस्था आहे.
संभ्रम दूर करा, मतदानातून धडा शिकवा,
आगामी पालिका निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे तर जबाबदारीची परीक्षा ठरणार आहे. संभ्रम दूर करून धाराशिवच्या विकासाच्या मारेकऱ्यांना नेमकं ओळखावे लागेल आणि त्यांना धडा शिकवावा लागेल. धाराशिवकरांनो,
अजून किती काळ खड्ड्यातून प्रवास करणार? अजून किती काळ आपल्या पैशाचा अपमान सहन करणार ?