पोलिसांकडे वाहनधारकांचा डेटा तयार
आरंभ मराठी / धाराशिव
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. आंदोलनाच्या वेळी थेट मुंबईकडे निघालेल्या अनेक वाहनधारकांना आता मुंबई पोलिसांकडून नोटीसा पाठवल्या जात असून, अनेक वाहनधारकांना नोटीस पाठवून मुंबईला बोलवण्यात येत आहे.
धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील एका वाहनधारकाला अशी नोटीस प्राप्त झाल्याने मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.आंदोलनात सहभागी झालेल्या आणि मुंबई जाम करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या या भव्य आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले होते. पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलकांची वाहने थांबवून तपासणी केली, तसेच मुंबईत जाण्यापासून वाहनांना प्रतिबंध करण्यात आला. तर काही वाहनांनी विरोध झुगारून थेट मुंबई गाठली. त्या वाहनांपैकीच काहींविरुद्ध आता भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंबईच्या गोवंडी पोलिस ठाण्यातून हिंगळजवाडी (ता. धाराशिव) येथील आंदोलकाच्या वाहनाला नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, संबंधित वाहनाचा वापर मुंबईतील चेंबूर चौकात आंदोलनासाठी करण्यात आला होता. या प्रकरणी वाहनधारकाला उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नोटीसमध्ये जर योग्य उत्तर मिळाले नाही, तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिसांच्या या कारवाईनंतर मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून, आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शांततामय पद्धतीने आरक्षणाची मागणी करणे हा लोकशाही हक्क असताना, आंदोलनात सहभागी झालेल्यांना नोटीसा पाठवून गुन्हे दाखल करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक मराठा कार्यकर्त्यांनी दिली आहे.
एकीकडे सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केली असती तरी दुसरीकडे कारवाईच्या माध्यमातून समाजाची मुस्कटदाबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे.