आरंभ मराठी / धाराशिव :
धाराशिव जिल्ह्याच्या अभ्यासू पत्रकारितेतील एक तेजस्वी दीप आज विझला. ज्येष्ठ पत्रकार,वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली व दांडगा जनसंपर्क असलेले श्री. दिलीप पाठक (नारीकर) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. वयाच्या उत्तरार्धातही ते तितक्याच जोमाने कार्यरत होते.
दिलीप पाठक यांनी दीर्घकाळ दैनिक सकाळचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. धाराशिव व परिसरातील प्रत्येक घडामोडीवर त्यांची बारकाईने नजर असायची. बातमीदार म्हणून त्यांचे ध्येय स्पष्ट होते,प्रथम अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे. म्हणूनच त्यांच्याकडे बातमी सर्वप्रथम आणि खात्रीशीर पोहोचते,याची खात्री होती.नवीन तरुण पत्रकारांना ते सातत्याने मार्गदर्शन करत.
पत्रकारितेत त्यांची स्वतंत्र शैली होती. शब्दांवर प्रभुत्व, वस्तुनिष्ठ दृष्टीकोन आणि सडेतोड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अनेक पुरस्कारांनी गौरवलेले पाठक यांनी केवळ लेखणीच नाही तर संबंध जपण्याची ताकदही दाखवून दिली. त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे प्रशासनापासून सामान्य जनतेपर्यंत प्रत्येकाला ते सहज उपलब्ध व्हायचे.
आज धाराशिवच्या पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी त्यांना आठवत आहेत. या पत्रकाराने नवीन पिढीला धाडस, अभ्यास आणि जनतेशी नाळ जोडून काम करण्याची शिकवण दिली.नुकत्याच झालेल्या धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आयोजित धाराशिव महोत्सवाला त्यांनी आवर्जून उपस्थिती लावत कौतुकाची थाप दिली होती.
त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता धाराशिव येथील कपिलधार स्मशानभूमीत होणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील या तेजस्वी दीपस्तंभाला आरंभ मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.