आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर उभारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मराठा क्रांती मोर्चाचे योद्धा नेते मनोज जरांगे पाटील हे उद्या, मंगळवारी धाराशिव शहरात येत आहेत.या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात येत आहे.
येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या भव्य मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, हा दौरा अत्यंत निर्णायक मानला जात आहे. या दौऱ्यात ते धाराशिव जिल्ह्यातील मराठा आंदोलक, समन्वयक, समाजप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.त्यांचा शहरातच मुक्काम असेल.
या बैठकीत २९ ऑगस्टच्या मोर्चाची पूर्वतयारी, जिल्हानिहाय जबाबदाऱ्या, सरकारकडून करण्यात येणाऱ्या आश्वासनांची सद्यस्थिती, समाजातील युवांचा सहभाग आणि पुढील दिशा या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन धाराशिव शहरात करण्यात येत आहे. सभास्थळ लवकरच निश्चित करण्यात येणार असून, जिल्हाभरातून मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, हा आरक्षणाचा लढा शेवटचा आहे. यावेळी मराठा समाजाला नुसते आश्वासन चालणार नाही, तर ठोस निर्णय हवा.
त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने या बैठकीत सामील होऊन मोर्चाच्या यशासाठी व्यापक पाठिंबा दर्शवेल, अशी आयोजकांना आशा आहे.