आरंभ मराठी / धाराशिव
नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने स्वतःच्या निष्क्रीय कारभाराचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. रस्त्यांची प्रचंड दुर्दशा, तुंबलेल्या नाल्या, त्यामुळे रस्त्यावर साचलेले तळे, कचऱ्याची समस्या, यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. मात्र, यात विद्यार्थ्यांची सत्वपरीक्षा सुरू आहे. मुख्य मार्गावर असलेल्या नूतन प्राथमिक शाळेच्या परिसरात नाल्यांचे पाणी तुंबल्याने विद्यार्थ्यांना शाळेचा रस्ता शोधणे कठीण झाले आहे. मात्र, झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचून रस्ते, घरं, दुकाने आणि विशेषतः शाळांचे परिसर जलमय झाले आहेत. परिस्थिती इतकी भयावह आहे की, शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी चिखल, साचलेलं पाणी आणि खड्ड्यांतून वाट काढत आहेत. काही ठिकाणी तर शाळेच्या आवारात एक-दोन फूट पाणी साचल्यामुळे वर्ग बंद ठेवावे लागले आहेत.
_
लहान मुलांचे हाल कोण पाहणार ?
लहान मुलांना दररोज सकाळी शाळेत पोहोचवताना धडकी भरते. रस्त्यांवरील खड्डे, वाहत्या गटारांचे पाणी, आणि ठिकठिकाणी साचलेला चिखल, हीच शिक्षणासाठीची वाट झाली आहे. काही शाळांमध्ये पाण्यामुळे वर्गात बसणे अशक्य झाले आहे. बर्याच पालकांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मुलांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
_
प्रशासनाचे ढिसाळ नियोजन,
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि धाराशिव नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे ही वेळ नागरिकांवर ओढवली आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे.140 कोटींची विकासकामे राजकारणात अडकली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.
गटारांची सफाई वेळेवर न होणे, आणि सांडपाण्याचा योग्य निचरा न होणे यामुळे हे संकट अधिक गडद झाले आहे.
_
संताप व्यक्त करण्याची ताकदही उरली नाही,
शहरातील अनेक नागरिक सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांतून आपला संताप व्यक्त करत आहेत. “धाराशिव हे जिल्ह्याचं ठिकाण असूनही येथे अशी परिस्थिती असेल तर गावांमध्ये काय अवस्था असेल ?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरपरिषदेचे माजी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कुठे आहेत? कोण जबाबदार ? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
_
आतातरी तातडीने उपाययोजना करा
शहरातील ही स्थिती पाहता तातडीने उपाययोजना न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणारच, पण आरोग्याचे संकटही ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, चिखलामुळे अपघात, आणि दूषित पाण्यामुळे साथीचे आजार उद्भवू शकतात. प्रशासनाने या समस्येकडे गंभीरपणे पाहून जलद उपाय करावेत,अशी नागरिकांची अपेक्षा आहे.