आरंभ मराठी / धाराशिव
होळी आणि धुळवडीच्या शुभ मुहूर्तावर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामातील 250 कोटींचा पीकविमा मंजूर झाला असून, येत्या पंधरा दिवसात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा पीक विमा खात्यावर जमा होईल अशी माहिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्यामुळे शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षा होती. खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. धाराशिव जिल्ह्यात एकूण ४ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती.
पिकविम्याची केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्याची रक्कम काही दिवसात पीक विमा कंपनीला वर्ग करण्यात आल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत.
प्रतिहेक्टरी किती मदत मिळणार याचा आकडा समोर आला नसला तरी साधारणपणे प्रति हेक्टरी ६२०० ते ६४०० रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. धाराशिव जिल्ह्यात एकूण अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचे वाटप पीक विमा कंपनीकडून करण्यात येईल अशी माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली. अतिवृष्टी अनुदानाचे वितरण सुरू असतानाच पीकविमा वितरणाची बातमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.