पतीराजाकडूनच हाकला जातो कारभार
ग्रामपंचायतीत महिला नामधारी ; पती कारभारी
सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी
धाराशिव –
शासनाने महिला सक्षम व्हावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. परंतु, महिलांना कारभार करताना पती राजाकडून स्वातंत्र्यच दिले जात नाही. पती राजाकडून महिलांच्या कामकाजात लुडबुड केली जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सक्षमीकरणाचे तीन तेरा वाजले असून, राजकारणात महिला सक्षमीकरण कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांसह सार्वजनिक जीवनातील संपर्कामुळे महाराष्ट्रातील स्थानिक राजकीय पक्षात कार्यक्षम आणि सक्षम महिला नेत्या उदयास आल्या आहेत. स्थानिक राजकारणात महिलांच्या प्रतिनिधीत्वात सातत्याने होत असलेली सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा राखून ठेवल्यामुळे महिला नेत्यांच्या राजकीय सहभागात वाढ झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या निवडणुकीत ५० टक्के आरक्षण दिले.
जिल्हा परीषद, पंचायत समितीला जिल्ह्यात सक्षमपणे महिलांनी काम केले. अपवादात्मक परिस्थितीत काही महिला पदाधिकाऱ्यांचे पतीदेव महिलांच्या कामकाजात लुडबुड करीत होते. सध्या प्रशासक राज आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेत महिला सदस्य नाहीत. परंतु जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे चित्र मात्र वेगळे आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये बहुतांश कामकाज महिला सदस्यांचे पतीच पाहतात. मासिक मिटिंगमध्ये उपस्थित राहणे, अधिकाऱ्यांना आदेश देणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती पातळीवरील शासकीय कामे पाहणे ही कामे सरपंच महिलांचे पतीच करीत आहेत. त्यामुळे एक प्रकारे महिलांच्या अधिकारावर गदा पती राजाकडून होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात ३२० महिला सरपंच –
धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील ६२२ ग्रामपंचायती मध्ये २०११ च्या जणगणनेनुसार महिलासांठी ३२० सरपंच पदे राखीव आहेत. त्यामध्ये जवळपास बहुतांश गावात महिला सरपंचाचे पतीचं कारभार करताना दिसतात. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीतही ६१ जिल्हा परिषद गटापैकी ३१ जागा महिलांसाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. निवडणुका लागल्यास त्यावर देखील केवळ नामधारी महिलाच पदावर बसवल्या जातील.
महिलांना स्वतंत्र विचाराने कारभार करू देण्याचे स्वातंत्र्य मिळावे –
सध्या सर्वच क्षेत्रात महिला त्यांचे काम चोख बजावत आहेत. फक्त स्थानिक राजकीय क्षेत्रात बहुतांशी महिला या नाममात्र पद भूषविताना दिसतात. ‘तुला काय माहित नसतं’, ‘तुला काय कळतं’ असं म्हणून त्यांचे पतीच संपूर्ण कारभार हाताळतात. त्यामुळे महिलेच्या वैयक्तिक विचारधारेची पायमल्ली होते. पतीने कामात सहकार्य जरूर करावे पण स्वतःचे मत पदस्थ महिलांवर लादू नये. जेणेकरून महिलांना पद देण्याचा उद्देशच फोल ठरेल. त्यांना त्यांच्या स्वतंत्र विचाराने कार्यभार करू देणं आवश्यक आहे.
श्रुतिका दत्ताञय हाजगुडे
राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील
तुगांव, ता.जि.धाराशिव.