Maharashtra Wether : राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे.
Maharashtra Wether : राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे.
कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत.
75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी
जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे. पण असे असलं तरीही पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नयेत असे आवाहन कृषी विभागसह तज्ज्ञ करत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र अनेकदा शेतकरी थोडाफार पाऊस पडला आणि शेती ओली झाली की लगेच लागवड सुरु करतात. मात्र पुढे पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजूनही मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झालेलं नाही.