मराठवाड्याचे रेल्वेमंत्री काय कामाचे, नागरिकांना पडला प्रश्न
प्रतिनिधी / ढोकी
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील रेल्वे स्टेशनवर जलद रेल्वे गाड्याच्या थांब्यासाठी कळंब नगरपालिका व केज (जि.बीड) नगरपंचायत, ढोकीसह धाराशिव व कळंब तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने ठराव देऊनही थांबा मिळत नसल्याने व्यापक जनअंदोलनाची गरज निर्माण झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे रेल्वेचे सी क्लास स्टेशन असून, या ठिकाणी रेल्वेच्या क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी सर्वच एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी या भागातील प्रवाशासह कळंब तालुका व बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील अनेक गावातून गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने करण्यात येत असूनही रेल्वे विभागाकडून डोळेझाक केली जात आहे.
धाराशिव व कळंब या दोन तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज तालुका व लातूर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुरूड येथील नागरीकांच्या सोयीसाठी ढोकी येथे सर्वच गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक आहे.मोठ्या गाडीसाठी ढोकी येथील रेल्वे स्टेशनवर लांबपल्ल्याच्या गाडीची क्राॅसींग व्यवस्था आहे .ढोकी रेल्वे स्थानकापासून कळंब हे तालुक्याचे ठिकाण सव्वीस किलोमिटर अंतरावर असून कळंब नगरपालिकेने ढोकी येथे सर्व सुपर फास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे.तसेच कळंब तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी ढोकी थांब्याची मागणी केली असून, लातूर तालुक्यातील मुरूड परिसरासह केज तालुक्यातील अनेक गावाना ढोकी येथे थांबा झाल्यास मोठा फायदा होणार आहे.ढोकी स्टेशन मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे व्यावसायीकांना या स्टेशनहुन मुंबई,कोल्हापुर,पुणे,नांदेड,अकोला,नागपूर,अमरावती,हैद्राबाद येथे जाणे सोयीचे होणार आहे.परंतु येथील रेल्वे स्टेशनवर येथून धावणा-या लातूर- पुणे इंटरसिटी,लातूर-मुंबई,नागपूर-कोल्हापुर, हैद्रा बाद-हडपसर ,अमरावती-पुणे,नांदेड- पनवेल, कोल्हापूर -धनबाद व सोलापूर – तिरुपती
ह्या गाड्या थांबत नाहीत या सर्व गाड्यांना ढोकी रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी कळंब नगरपालिका,केज नगरपंचायत व ढोकी ग्रामपंचायत केली होती. रेल्वे विभागाने अद्याप दखल न घेतल्याने नागरिक अंदोलनच्या पावित्र्यात आहेत.
भाविकांची अडचण
संतसांप्रदायाची पताका देशभर फडकवणारे संत नामदेव महाराज कालीन संतश्रेष्ठ वैराग्य महामेरू गोरोबाकाकांचे जन्मगाव असलेले तेर येथे गोरोबा काकांची समाधी आहे. ढोकीपासुन अवघ्या आठ किलोमीटर वर असलेल्या गोरोबा काकांच्या समाधी दर्शनासाठी महाराष्ट्र सह देशभरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात.ढोकी येते एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे.
औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल
ढोकी येथे तेरणा साखर कारखाणा, बियाणे निर्मिती करणारे महाबिजचा बियाणे, पवनराजे ऍग्रो, डी.एम.पाटील ऍग्रो या तीन बियाणे निर्मिती कंपन्या असून यासोबतच त्रिमुर्ती उद्योगसमूहाचा लोखंडी बैलगाडी तसेचं ट्रँक्ट्ररवर चालणारी ऊसवाहतूकीची गाडी निर्मीतीचा कारखाना ढोकी येथे आहे. या ठिकाणी जलद गाड्यांना थांबा मिळाल्यास या भागाच्या औद्योगीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.
२२ गाड्या पैकी चार गाड्यांना फक्त थांबा
येथील रेल्वे स्थानकातून राज्य व आंतरराज्य मिळून १८ जलद गाड्या व चार पॅसेंजर गाड्या धावल्या जातात त्यापैकी परळी मिरज, मिरज परळी, निजामबाद -पंढरपूर व पंढरपूर- निजामाबाद या चार पॅसेंजर गाड्यांना फक्त थांबा आहे.
पंधरा वर्षापासून पाठपुरावा
ढोकी येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा म्हणून खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,खा.रजनी पाटील,माजी
खा. रविंद्र गायकवाड तसेच सोलापूर परिमंडळाचे प्रबंधक यांच्यामार्फत गेल्या पंधरा वर्षापासून नागरिक पाठपुरावा करत आहेत.
पाठपुरावा करतोय
नांदेड- पनवेल या गाडीला बार्शी व ढोकी येथे थांबा देण्याची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करण्यात करण्यात आली होती. त्यापैकी बार्शी स्थानकावर थांबा मंजूर झाला असून ढोकी स्थानकावर थांब्यासाठी पाठपुरावा चालू आहे त्यासोबतच इतर जलद गाड्यांच्या थांब्यासाठी नव्याने पाठपुरावा केला जाईल.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार धाराशिव.
सकारात्मक पाठपुरावा
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा या मागणी करिता पाठपुराव्याचा आढावा घेऊन स्थानिक नागरिकांसोबत बैठक घेऊन ढोकी येथे जलद गाड्यांच्या थांब्यासाठी सकारात्मक पाठपुरावा केला जाईल.
राणाजगजितसिंह पाटील, आमदार
खा.रजनी पाटील यांनी तत्कालीन रेल्वेमंत्र्याकडे केला होता पाठपुरावा
राज्यसभा खासदार श्रीमती रजनीताई पाटील यांनी तात्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिलेल्या निवेदनात केज ही बीड जिल्हयातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने बाकीच्या शहराच्या तुलनेने व आर्थिकदृष्ट्या ढोकी येथे सर्व जलद गाड्यांना थांबा फायदेशीर ठरणार आहे. नागपूर,अकोला,पुणे ,मुबंई,हैद्राबाद आदि शहरात प्रवास सुलभ होणार आहे. अशा आशयाचे निवेदन दिले होते.
व्यवसाय वाढीसाठी आवश्यक
विना व्यत्यय प्रवासाचे जलद साधन म्हणून ग्रामीण भागात रेल्वेकडे पाहिले जाते. छोटे मोठे उद्योग धंदे ग्रामीण भागात चालू झाल्यामुळे व्यवसाय वाढीसाठी शहराशी कनेक्ट असणे गरजेचे आहे. त्यामुळे ढोकीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी जलद गाड्यांना थांबा मिळाल्यास या भागाचा कायापालट होईल तसेच उद्योजकांना व्यवसाय वाढीस मदत होईल.
सुभाष लालासाहेब देशमुख,उद्योगपती, त्रिमूर्ती उद्योग समूह.
ढोकी शहर हे परिसरातील खेड्या पाड्यातील मोठी बाजारपेठ आहे.या ठिकाणी साखर कारखान्यासह विविध प्रक्रिया उद्योग आहेत. शेजारील कळंबसारखे शहर व बीड जिल्ह्यातील सीमावर्ती भाग जवळ असल्याने ढोकी येथून रेल्वेने ये जा सोयीची ठरू शकते. पश्चिम महाराष्ट्रात छोट्या छोट्या गावांना एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे परंतु उदासीन राजकीय अनास्थेमुळे ढोकी येथे थांबा होत नाही.उदासीन लोकप्रतिनिधी या भागाची शोकांतिका आहे. त्यामुळे लोकांनाच आता रस्त्यावर उतरावे लागेल.
कुणाल जीवनराव घुंगार्डे,ढोकी.
रेल्वे राज्यमंत्री मराठवाड्याचे, पण काय कामाचे ?
रेल्वे राज्यमंत्री मराठवाड्याचे पण काय कामाचे, असा सणसणीत सवाल विचारला जात आहे.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनीही ग्रामीण भागाला रेल्वे थांबे मिळत नाहीत म्हणून टीका केली होती. त्याचा प्रत्यय येत असून पश्चिम महाराष्ट्रात लहान लहान गावाला रेल्वेचे एक्सप्रेस गाडीचे थांबे आहेत.