प्रतिनिधी / धाराशिव
शहरातील साईराम नगर येथील एका किरायाच्या घरात राहणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील पोलीस कॉन्स्टेबल बालाजी भंडारे यांनी पाच दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलीस तपासात आणि भंडारे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारे यांची आत्महत्या महिलेच्या छळामुळे झाल्याचे निष्पन्न झाले असून, संबंधित महिला भंडारे यांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी भंडारे यांचे सासरे नानासाहेब लांडे (बामणी, ता.धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे जावई बालाजी बळीराम भंडारे, (वय 34 वर्षे, रा. वाडी) हे शहरातील साईराम नगर येथे शुभांगी नंदु जगताप यांच्या घरी किरायाने वास्तव्य करत होते. 10 ऑगस्ट रोजी दुपारी बालाजी यांनी शुभांगी यांच्या बेडरुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. शुभांगी नंदु जगताप (रा. साईरामनगर ) यांनी पैशांची मागणी करून बालाजी यांना वारंवार त्रास दिला होता. या छळाला कंटाळून बालाजी भंडारे यांनी आत्महत्या केली आहे. नानासाहेब लांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुभांगी जगताप यांच्याविरोधात शहर पोलिसात भादंवि 306 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएसआय होण्याचे होते स्वप्न
राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल असलेले बालाजी भंडारे हे वाडी बामणी येथून दररोज ये-जा करत होते. मात्र त्यांना खात्याअंतर्गत पीएसआय होण्याची इच्छा होती. त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून ते साईराम नगर भागात जगताप यांच्या घरी किरायाने वास्तव्य करत होते. यादरम्यान त्यांचा जगताप परिवाराशी संपर्क वाढला. त्यातून त्यांना शुभांगी जगताप यांनी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ही बाब त्यांनी त्यांच्या पत्नीलाही सांगितली होती. मात्र,10 तारखेला बालाजी भंडारे यांनी शुभांगी यांच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यासंदर्भात शहर पोलिसांनी शुभांगी जगताप यांचे पती नंदू जगताप यांचीही चौकशी सुरू केली आहे.