जिल्ह्यात १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
गुळपिठी करखान्यांकडून ३० टक्के ऊसाचे गाळप
सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला होता. हा हंगाम आता संपल्यात जमा असून जिल्ह्यातील बारा पैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद झाली असून उर्वरित ३ साखर कारखाने लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील ५ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांनी यंदा १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
चालू गळीत हंगामात ३ मार्च २०२५ च्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यात २८ लाख १७ हजार ३६५ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून १९ लाख १६ हजार ९७६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखरेचा सरासरी उतारा केवळ ६.८ टक्के आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १२ पैकी ९ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.
यामध्ये तेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब बिराजदार, नॅचरल शुगर, धाराशिव, भैरवनाथ सोनारी, कंचेश्वर, लोकमंगल, बाणगंगा या कारखान्यांचा समावेश आहे. उर्वरित ३ साखर कारखाने लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. ५ सहकारी कारखान्यांनी ११ लाख ५१ हजार ६७९ टन उसाचे गाळप करत ७ लाख ३० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
सहकारी कारखान्यांचा साखर उतारा ६.३४ टक्के आहे. ७ खासगी कारखान्यांनी १६ लाख ६५ हजार ६८५ टन उसाचे गाळप करून ११ लाख ८६ हजार २७६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून साखर उतारा ७.१२ टक्के आहे. नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रीज रांजणी या कारखान्याने ४,७१,२१४ टन ऊस गाळपातून ४,३७,७५० क्विंटल साखरेचे उत्पादन काढले. या शुगर इंडस्ट्रीजचा साखर उतारा ९.४१ आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त ११.१६ साखर उतारा असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील कंचेश्वर शुगरने २,५०,५३७ टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून २,८०८५५ क्विंटल साखर उत्पादन केली.
भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने १,२४,२४१ टन ऊस गाळप करून, ८४,२०० क्विंटल साखर उत्पादन केली आहे. मुरूम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याने २.२०,१९० टन ऊस गाळप करून २,२१,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तर केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना कारखान्याने २,०५,०२८ टन ऊस गाळप करून १,८२,४०० क्विंटल साखर उत्पादन काढले.
भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याने १,४४०३५ टन ऊसाचे गाळप करून १,२९,९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तर लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील क्विनर्जी इंडस्ट्रीज भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने ४,५८,१८५ टन ऊसाचे गाळप करून १,१२,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल यांनी ८१४६० टन ऊस गाळप केला त्यामधून ७०६४१ क्विंटल साखर तयार झाली.
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने १,२९,८४७ टन ऊस गाळून त्यातून १,१३,१५० क्विंटल साखर उत्पादीत केली. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने १,३९,६२१ टन ऊसातून ६५६००क्विंटल साखर काढली. लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज खेड तालुका लोहारा या कारखान्याने २,१८,२८६ टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून २,१८,२८० क्विंटल साखर काढली.
सरासरी २७०० रुपये भाव –
यावर्षी सर्वच साखर कारखान्यांनी ऊसाला सरासरी २७०० ते २८०० रुपये प्रति टन भाव दिला. गुळपिठी कारखान्यांनी देखील असाच भाव दिला. यावर्षी भाव देण्याची स्पर्धा झाली नाही तरी गुळपिठी करखान्यांमुळे साखर कारखान्यांना देखील हंगामाच्या सुरुवातीलाच दर जाहीर करावे लागले. यावर्षी एकूण ऊस क्षेत्रापैकी तीन ते पस्तीस टक्के ऊस गुळपिठी कारखान्यांनी गाळप केला.
पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाची समस्या –
पुढच्या वर्षीचा गाळप हंगाम लवकर सुरू होऊन उशीरा संपेल अशी शक्यता आहे. परंतु अतीरिक्त उसाची समस्या शेतकऱ्यांना भेडसावणारी ठरणार आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाची समस्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरू शकते.