जहीर इनामदार / नळदुर्ग
नळदुर्ग (ता. तुळजापूर ) शहरात डोळे येण्याची साथ पसरली असून, दररोज ४0 ते ५० नवे रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. रुग्णामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. काही शाळेत विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. डोळ्यांची साथ पसरली असली तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही तर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
शहरात अनेक ठिकाणी हा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात ओपिडीमध्ये मागील ४ दिवसात दररोज जवळपास ४० ते ५० रुग्ण येत आहेत, यामध्ये लहान मुलं,महिलांचाही समावेश आहे. हा रोग संसर्गय जन्य असल्याने याचा फैलाव झापाट्याने होत आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे,आरोग्य प्रशासननेही चाचणी मोहीम राबवून योग्य उपचार करावा, तसेच यापासून स्वतःचा बचाव कसा कारावा याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. दरम्यान शाळेतील मुलामध्येही या आजाराचा शिरकाव होत असून शिक्षकानी खबरदारी म्हणून लक्षणे असलेल्या मुलांना शाळेत येण्यापासून प्रतिबंध करावा.
अशी आहेत लक्षणे
डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे,बुबूळमध्ये दुखणे,अशी डोळे आल्यानंतरची लक्षणे आहेत. यासोबत कदाचित सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही दिसून येत आहेत. डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार करून घेण्याची गरज आहे.
नागरिकांना आवाहन
■पावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा.
■ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे
■डोळ्याला वारंवार हात लावू नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.
■एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
■कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही.
..तर आजार वाढू शकतो
डोळे आल्यावर हा आजार काही दिवसांनी आपोआप बरा होतो. पण काही मोजक्या केसेसमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता असते आणि तो संसर्ग बुबुळांमध्ये जाऊ शकतो. तेव्हा बुबुळांवर पांढरे ठिपके दिसू लागतात अश्या परिस्थितीमध्ये आजाराचा गंभीरपणा वाढतो.
आजाराकडे दुर्लक्ष नको,सल्ला घ्या
नळदुर्ग शहरात दिवसेंदिवस डोळे येण्याची साथ वाढत आहे ,ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांनी हात स्वच्छ धुवत राहावेत. जेणेकरुन डोळ्यातून आलेला स्त्रावाला हात लागल्याने इतरांना संसर्ग होणार नाही. डोळे स्वच्छ पाण्याने धूत राहणे,स्वच्छ टॉवेल, रुमाल वापरावा व घरातील इतर लोकांना हा आजार होणार नाही याची काळजी घ्यावी. हा आजार फार गंभीर स्वरुपाचा गणला जात नसला तरीही त्याकडे दुर्लक्ष करु नये,आरोग्य सल्ला घ्यावा.
श्रद्धा कदम, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र नळदुर्ग.