प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा भाऊबंदकी उफाळून आली आहे. कधी तू बाळ आहेस म्हणत तर कधी तुम्ही बापलेकाने जिल्हा भकास केला, म्हणत जिल्ह्याचे खासदार ओमराजे आणि तुळजापूरचे आमदार राणा पाटील एकमेकांवर धावून जात आहेत. या आरोप-प्रत्यारोपाचे लोण आता थेट होर्डिंग्जपर्यंत पोहोचले आहे. शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून भकास @ 40 असे फलक उभारण्यात आले तर त्याला उत्तर म्हणून भाजपने भंगार @ 16 अशा आशयाच्या फलकातून उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू झाला. वास्तविक या राजकारणातून जनतेच्या हिताचे काय,असा प्रश्न उपस्थित झाला असून, आम आदमी पक्षाने दोघांच्या भाऊबंदकीवर सडकून टीका केली आहे.
चला सक्षम पर्याय देऊ
पक्षाचे नेते ऍड. अजित खोत यांनी ओमराजे तसेच डॉ.पद्मसिंह पाटील या दोन्ही घराण्यावर निशाणा साधला आहे. ऍड.खोत म्हणतात, आम्ही दोघे भाऊ,भाऊ, अख्खा जिल्हा आम्ही दोघे मिळून खाऊ,अशी ही प्रवृत्ती आहे. चाळीस वर्षांमध्ये काय केलं डॉक्टर पद्मसिंह पाटलाला प्रश्न विचारला जातो. प्रश्नाबद्दल काय अडचण नाही तो योग्यच आहे. त्याचवेळी कै. पवन राजे निंबाळकर सुद्धा 2002 पर्यंत डॉक्टर पाटलाला खांदाला खांदा लावून साथ देत होते. तुमच्या ताब्यात तेरणा कारखाना आला. लोकांनी आमदारकी दिली, पुन्हा मोदींच्या जीवावर खासदारकी भेटली, काय दिवे लावले पंधरा वर्षात, ते तर लोकांना सांगा. त्यांनी नाही केलं तर तुम्हीही नाही केलं, शेवटी दोघा भावांनी अख्खा जिल्हा मिळून खाल्ला हे तर मान्य करा. चला क्षमतेने पर्याय उभारण्याच्या दृष्टिकोनातून आप पर्याय आहे,असे म्हणत करोडोचे बॅनर आज दोघा भावांनी लावले दोघा भावाने आज लावले, तो दोघा भावांनी लावलेल्या बॅनरचा पैसा कुठून आला आहे एवढं तरी जनतेला साधं उत्तर द्या,अशी मागणी ऍड. खोत यांनी केली आहे.