प्रतिनिधी/पुणे
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात मान्सुन बरसला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गड-किल्ले, घाट वाटा, नुकत्याच सुरु झालेल्या धबधब्यांच्या परिसरात सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ दिसत आहे,
पावसाळा म्हंटलं की प्रत्येकाचे पाऊलं निसर्गाच्या सानिध्यात जायला लागतात हिरवेगार डोंगर ,झाडी ,नद्या ,धबधबे यांचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकजण निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी वेळ काढतो. निसर्गात माणूस जुन्याचा नवा होतो. पावसाची रिपरिप,मित्रांचा ग्रुप ,गरमभजे, कडकचहा हे समीकरण म्हणजे पावसाळा. पाऊस आठवणी घेऊन येतो पाऊस नव्या आठवणी निर्माण करतो. महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आणि प्रत्येकाची पावले निसर्गाकडे वळली. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात याच पावसाचा आनंद घेण्यासाठी शनिवार रविवारच्या सुट्टी काढून लोक आवर्जून फिरायला जाताना दिसतात. रविवारच्या सुट्टीचा लोहगड (पुणे) किल्ल्यावरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. लोहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या लोकांची एवढी गर्दी होती की अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. किल्ल्यावर सूचना करण्यासाठी गडपाल उपस्थित नव्हता. तब्बल चार तास पर्यटक लोहगड किल्ल्यावर अडकून पडले होते.हल्लीची तरुणाई ट्रेकिंग करायला जाते. पण गड किल्ले हा ट्रेकिंगचा विषय नसून इतिहास जपण्याचा,अभ्यासाचा विषय आहे हे कळायला हवं. गड किल्ल्यांचे पावित्र्य आपल्याकडूनच राखले जात नाहीये. गड किल्ले फिरण्याचा विषय नसून इतिहास जपण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले मंदिराइतकेच पवित्र असून बेजबाबदार युवा पिढीने मात्र हैदोस घातलेला दिसतोय. फोटोग्राफीच्या धुंदीत गडावरच्या भिंतींवर चढतात पण त्या पुरातन भिंती ढासळायला लागतील याकडेही त्यांचं लक्ष नसतं. गडावरील टाक्या म्हणजे यांचा स्विमिंग पूल झाला असून त्यामध्ये पोहोतात,नाचतात,रिल्स बनवतात. गड किल्ले हे हल्लीच्या तरुणांचे पिकनिक स्पॉट झालेले आहेत. ज्या भूमीच्या संरक्षणासाठी महाराजांनी जीवाची बाजी लावली महाराजांच्या रक्तांच्या अभिषेकाने पावन झालेली ही भूमी ज्यासह्याद्री आणि गड किल्ल्यांच्या जोरावर स्वराज्याचे बाळसं धरलं ज्याचा विस्तार हिंदुस्थानभर झाला ज्या गडकिल्ल्यांच्या संरक्षणार्थ मावळ्यांनी प्रसंगी देहाचा कोट करून त्यांना सुरक्षित ठेवलं. तोच हा महाराष्ट्र तोच हा सह्याद्री आणि तीच ही पवित्र भूमी तरुणाईच्या ट्रेंड मुळे महाराष्ट्राच्या इतिहासाची अस्मिता धुळीस मिळवली जाते की काय अशी भीती निर्माण होतेय. अनेक शिवप्रेमींनी याबद्दल खंत देखील व्यक्त केली आहे.