प्रतिनिधी | कळंब
शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नति व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूति देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर केवळ आध्यात्मिक उन्नतीकडेच असते. असे मत डिकसळ येथे गुरुपौर्णिमे निम्मित आयोजित कीर्तनात ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी व्यक्त केले.
पुढे कीर्तनातून प्रबोधन करताना महाराज म्हणाले की, ‘ईश्वर आणि भक्त वेगळे असत नाहीत; पण ईश्वर निर्गुण असल्यामुळे त्याला देहभाव असलेल्या भक्ताशी बोलता येत नाही; म्हणून तो आपल्या कार्यब्रह्माशी भक्ताची गाठ घालून देतो. त्या कार्यब्रह्मालाच गुरु असे म्हणतात; म्हणजेच गुरूंच्या
रूपाने तोच बोलत असतो.’
आपले गुरु सर्वज्ञ आहेत. आपल्याला काय आवश्यक आणि उपयुक्त आहे, हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते, या श्रद्धेने केवळ साधना करत रहावे. आपली पात्रता नसतांना आपण काही मागितले, तर ते देणार नाहीत. आपली पात्रता असली आणि आपण काही मागितले नाही, तरी ते देतातच. मग त्यांच्याकडे काही मागायचे तरी कशाला ?
नेमका हाच अर्थ आपल्या कीर्तनातून सांगून डीकसळ येथील ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी गुरू पौर्णिमेनिमित्त आपल्या शिष्यांना गुरू शिष्य विषयाबद्दल कानमंत्र दिला.
डिकसळ येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरू पौर्णिमेनिमत्त गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डिकसळ मधून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिरासमोर भारुडाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थांचे उत्तर अधिकारी ह.भ.प. परमेश्वर महाराज बोधले, ह.भ.प. बाळासाहेब महाराज बोधले, ह.भ.प. अण्णा महाराज बोधले, ह.भ.प. रामेश्वर महाराज बोधले, ह.भ.प. विजय बोधले, नवनाथ महाराज आबिरकर, डिकसळ येथील ग्रामस्थ यांनी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमानिमित्त हजारो भाविक भक्तांनी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ह.भ.प. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांच्याकडून गुरुमंत्र घेतला. यावेळी महाप्रसादाचे वाटप झाले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी झाली होती.