इटकूर प्रशालेत नवोदय-शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सन्मान
प्रतिनिधी / इटकूर
कळंब तालुक्यातील इटकूर जिल्हा परिषद शाळेतील नवोदय-शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, एन. एम. एम. एस. परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या एकूण 21 विद्यार्थ्यांचा सोमवारी विविध पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कसबे तडवळे येथील रहिवासी व सध्या अमेरिका येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे डिलिव्हरी पार्टनर या पदावर कार्यरत प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, ते म्हणाले, बुद्धिमत्ता आणि गणित विषयात नैपुण्य असेल तर कोणत्याही स्पर्धेत यश मिळवता येते.
कार्यक्रमासाठी हसेगाव येथील फुफ्फुस व छाती रोग तज्ञ डॉ. अभिजीत यादव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गतवर्षी नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, एन.एम.एम.एस. या सर्व परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवत कळंब तालुक्यातील प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून नावलौकिक मिळवला. यामध्ये प्रशालेच्या एकूण 21 यशवंत विद्यार्थ्यांचा शालोपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. अभिजीत यादव म्हणाले की, कोणत्याही कामातील सातत्य आणि ध्येयनिष्ठा हेच यशाचे रहस्य आहे.
यावेळी प्रशालेतील नवोदय-शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रिया कोठावळे, सिद्धी कानडे, संस्कृती भारती, समर्थ मिटकरी, सिद्धी पावले, आदिती आडसूळ, चैतन्य गंभीरे, रिया आडसूळ, वैभवी जाधव, आरोही शिंदे, स्नेहा फरताडे, आदित्य आडसूळ, कृष्णा गंभीरे, गोविंद जाधव, स्वराली वाघमारे या विद्यार्थ्यांचा भरघोस बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. बक्षिसासाठी पालकामधून सुमारे 21000 हजार रुपये लोकवाटा जमा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास पावले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली यादव यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक तुकाराम गरुडे यांनी केले. आभार सहशिक्षक चंद्रकांत शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अनिल क्षीरसागर, गणेश कोठावळे, वृषिकेत चौधरी, श्रीराम मुंढे, श्रीमती काझी, श्रीमती आडसूळ, लक्ष्मण आडसूळ, सचिन गंभीरे, अभयसिंह आडसूळ, वल्लभ पोते, विजय देसाई, गोपाळ नांदुरे आदींनी परिश्रम घेतले.