आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव मतदारसंघात शिवसेना उबाठा गटात बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. ते मंगळवारी आपली उमेदवारी दाखल करणार असून, त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, मकरंद राजे निंबाळकर यांनी शिसेनेकडून तुळजापूर विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ही जागा काँग्रेस पक्षाकडे असल्याने शिवसेनेला उमेदवार देता येत नव्हता. मकरंद राजे हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत.
मकरंद राजे निंबाळकर यांनी 2019 च्या धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना डावलून कैलास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.तेव्हापासून मकरंद राजे नाराज आहेत. मात्र त्यांना 2024 च्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र उमेदवारी न देण्यात आल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ते मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना शिवसेनेतील काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी साथ देण्याचा निर्णय घेतला असून, पक्षात बंडखोरी झाल्यास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांची डोकेदुखी वाढू शकते.दरम्यान,पक्षाकडून त्यांची नाराजी दूर केली जाणार का,हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.