आजपासूनच प्रशासनाकडून नव्या नावाची अंमलबजावणी, सरकारच्या तांत्रिक चुकीमुळे आली होती अडचण
प्रतिनिधी / धाराशिव
उस्मानाबाद की धाराशिव, हा मुद्दा काही केल्या संपत नाही. याचिका दाखल झाल्यानंतर शासनाच्या तांत्रिक चुकीमुळे न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच उस्मानाबाद व औरंगाबाद नाव वापरण्याचा निर्णय घेतला होता. आता शासनाने तांत्रिक चूक दुरुस्त करून उस्मानाबाद ऐवजी धाराशिव आणि औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर नावाचे गॅझेट प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा उस्मानाबादऐवजी शहर आणि उपविभागासह जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगरच्या संदर्भात देखील अशीच प्रक्रिया करण्यात आली आहे.हे गॅझेट शुक्रवारी प्रसिध्द करण्यात आले आहे.
राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात दोन्ही शहराचे नामांतर केले होते. मात्र या प्रक्रियेत तांत्रिक चूक झाली होती. उस्मानाबाद आणि औरंगाबाद या केवळ शहराचे नामांतर करण्यात आले होते. उपविभाग, जिल्हा, तालुका अशा नावात बदल करण्यात आला नव्हता.दरम्यान नामांतराच्या विरोधात काही संस्था, संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सरकारला या संदर्भात म्हणणे मांडण्यास सांगितले होते, त्यानंतर सरकारने आपली बाजू मांडताना दोन्ही जिल्ह्याच्या संपूर्ण नावाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे नामांतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्वीच्या नावाचा उल्लेख करण्याची तयारी दाखवली होती.त्यामुळे सरकारने दोन्ही जिल्हा प्रशासनाला पूर्वीच्याच नावाचा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आता मात्र शासनाने शहरासह तालुका, उपविभाग आणि जिल्हा अशा सगळ्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया केली असून, दुरुस्तीसह शुक्रवारी गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे आता शासनाच्या अधिकृत गॅझेटनुसार धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर या दोन्ही शहराचे, जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे.मात्र आता यावरही उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊ शकतात.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या प्रक्रियेमुळे मराठवाड्यात शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. यासंदर्भात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, राज्य सरकारने शुक्रवारी गॅझेटमध्ये नावाची प्रसिद्धी केली असून, आता प्रशासकीय पातळीवर याची आजपासूनच अंमलबजावणी केली जाईल.












